धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल
मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभागासोबत झाली महत्त्वाची बैठक
प्रतिनिधी।
गोंदिया। समर्थन मूल्यावर धान खरेदी अंतर्गत मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदीचे ऑनलाइन नोंदणीकरण करण्यासाठी नवीन पद्धतीने बीम ॲपच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. परंतु या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात धानाचे चुकारे आणि बोनस रक्कम अद्याप जमा झालेली नाही.
या प्रकरणावर धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. आमदार अग्रवाल यांनी या बाबीचे संज्ञान घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची व्यथा प्रत्यक्ष सांगितली आणि त्वरित तोडगा काढण्याची विनंती केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तात्काळ आदेशानंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस श्री. अनिल डिग्गीकर, सचिव – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, श्री. पवार, महाव्यवस्थापक – मार्केटिंग फेडरेशन, श्री. भगवान घाडगे, उपसचिव – वित्तीय सल्लागार, श्री. राऊत, उपसचिव, श्री. सुशांत पाटील – डेक्स ऑफिसर तसेच श्री. बाबाराव सूर्यवंशी – बीम पोर्टल उपस्थित होते.
आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान शासकीय समर्थन मूल्यावर मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी केले जाते. या दोन्ही मंडळांनी यापूर्वी एनईएमएल ॲपद्वारे शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु आता मार्केटिंग फेडरेशनने आपले नवीन ॲप बीम ॲप सुरू केले असून त्याद्वारेच ऑनलाइन नोंदणी केली जात आहे.
या बीम ॲप अंतर्गत होत असलेल्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या त्रुटी समोर येत आहेत. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे व बोनस रक्कम जमा झाली आहे, मात्र अजूनही अनेक लाभार्थी शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा झालेली नाही.
आमदार अग्रवाल म्हणाले की, बीम ॲपमधील उणिवा तात्काळ दुरुस्त करून सर्व शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करून त्यांच्या खात्यात धानाचे चुकारे व बोनस रक्कम जमा करण्यात यावी.
या प्रकरणावर अन्न पुरवठा विभागाने सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून बीम ॲपमधील समस्या दूर करून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. सर्व पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.













